उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथील राज्य उत्पादक शुल्क कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढासळल्याचे चित्र समोर येत असून, कार्यालय वारंवार बंद राहणे आणि अधिकाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः महिलांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या असतानाही संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे. उदगीर शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यात राज्य उत्पादक शुल्क विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात या अवैध धंद्यांवर काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र, सध्याच्या अधिकाऱ्यांच्या काळात हे प्रकार पुन्हा वाढल्याची चर्चा आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, कारवाई करण्याऐवजी काही अधिकारी ‘हप्ते’ गोळा करण्यातच व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांकडून दरमहा तीन ते पाच हजार रुपये वसूल केले जात असून, महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच हे व्यवहार पूर्ण केले जातात, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. उदगीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चार ते पाच अवैध दारूची दुकाने उघडपणे सुरू आहेत. तालुक्यातील गावांची संख्या लक्षात घेता, अशा दुकानांची एकूण संख्या मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. दररोज वाढत चाललेल्या या अवैध दारू व्यवसायामुळे सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य उत्पादक शुल्क अधीक्षकांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि अवैध दारू विक्रीवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Social Plugin