Type Here to Get Search Results !

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उदगीर तालुक्यामध्ये बोगस शाळाना खत पाणी


उदगीर/ प्रतिनिधी: 
उदगीर तालुक्यात बेकायदेशीर शाळांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उदगीर तालुक्यात अनेक ठिकाणी परवानगीशिवाय शाळा सुरू असल्याचा आरोप नागरिक आणि पालकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या शाळांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण संचालकांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या पत्रामध्ये बेकायदेशीर शाळांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, या आदेशानंतरही उदगीर तालुक्यातील संबंधित शाळांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. उदगीर तालुक्यात एकूण 372 शाळा असून त्यापैकी जवळपास 148 शाळा या शहर परिसरात आहेत. या संख्येमध्ये काही शाळा नियमबाह्य पद्धतीने चालत असल्याचा आरोप आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांचे म्हणणे आहे की, काही बोगस शाळांना गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्यानेच या शाळा निर्भयपणे सुरू आहेत. पालकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून, मुलांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
एका शाळेचा यु डायस नबर दुसऱ्या शाळेला कसा संस्थाचालक व गटशिक्षणाधिकारी यांची मीली भगत की काय अशी चर्चा पालकाकडून होत आहे“बेकायदेशीर शाळांमध्ये ना योग्य सुविधा आहेत, ना प्रशिक्षित शिक्षक. अशा ठिकाणी मुलांचे भविष्य धोक्यात येत आहे,” अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत स्पष्टता देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एकूणच, उदगीर तालुक्यातील बेकायदेशीर शाळांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे चित्र आहे.