उदगीर प्रतिनिधी
तोगरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) वतीने प्राध्यापक शिवाजी ज्ञानबाराव मुळे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे तोगरी मतदारसंघातील मतदारांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.प्राध्यापक शिवाजी मुळे हे अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. तसेच सामाजिक चळवळींमधील सहभागामुळे गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या अडचणी त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून माहीत आहेत. पाणीटंचाई, शिक्षणाची अपुरी साधने, रोजगाराचा अभाव, आरोग्य सुविधा यांसारखे मूलभूत प्रश्न तोगरी गटात आजही गंभीर स्वरूपात आहेत.निवडून आल्यानंतर या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करणार असल्याचा विश्वास शिवाजी मुळे यांनी व्यक्त केला आहे. “राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर लोकांच्या प्रश्नांसाठी असावे,” ही भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली आहे. त्यामुळे पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढताना दिसत आहे.विशेष म्हणजे, एकही रुपय न खर्च करता केवळ जनसंपर्क, संवाद आणि कामाच्या जोरावर मतदारांचे समर्थन मिळवण्याचा निर्धार समर्थकांनी व्यक्त केला आहे. तोगरी मतदारसंघातील अनेक गावांतून त्यांना प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.आगामी निवडणुकीत तोगरी गटाचा निकाल हा बदलाची नांदी ठरेल का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Social Plugin