उदगीर प्रतिनिधी:
उदगीर शहरात सध्या मटक्याच्या अवैध व्यवसायाने थैमान घातले असून, शहराच्या कानाकोपऱ्यात सर्रासपणे हे धंदे सुरू आहेत. विशेष म्हणजे, या बेकायदेशीर व्यवसायाला स्थानिक पोलीस प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांचे संसार उघड्यावर येत असून, शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या मटका व्यवसायाकडे स्थानिक पोलीस प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठराविक पोलीस अधिकारी आणि मटका चालकांचे साटेलोटे असून, हप्तेखोरीमुळे या अवैध धंद्यांना मोकळी वाट मिळाली आहे. "पोलिसांच्या आशीर्वादानेच हे धंदे फोफावत आहेत," असा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या अवैध व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, असे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.या मटका व्यवसायामुळे गरीब कुटुंबांचे कंबरडे मोडले आहे. कष्टकरी आणि गरिबांची आयुष्यभराची कमाई या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकदा नागरिकांनी तक्रार करूनही पोलीस केवळ कारवाईचे नाटक करतात किंवा हप्ते वसुलीवरच भर देतात, असा आरोप नागरिक करत आहेत. पोलीस अधिकारी कारवाई करण्याऐवजी मटका चालकांकडून वसुली करण्यातच मग्न असल्याने सामान्य जनतेत पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी आता पोलीस महानिरीक्षक (IG) यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कारवाई होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्तरावर हे मटक्याचे जाळे नष्ट होणार नाही, असे मत सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत. आता पोलीस महानिरीक्षक या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित अधिकारी आणि मटका चालकांवर कठोर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण उदगीरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Social Plugin