Type Here to Get Search Results !

निडेबन–लोहारा जिल्हा परिषद गटातून मधुकरराव एकुरकेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा महायुतीत हालचालींना वेग


उदगीर प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून निडेबन किंवा लोहारा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी–भाजप महायुतीकडून मधुकरराव एकुरकेकर यांना उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही केवळ चर्चा नसून, पडद्यामागे हालचाली वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.माजी समाजकल्याण सभापती म्हणून प्रभावी कार्यकाळ गाजवलेले मधुकरराव एकुरकेकर सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. प्रशासकीय अनुभव, जनसंपर्क आणि विकासाभिमुख कामगिरीमुळे ते महायुतीसाठी “सेफ कॅंडिडेट” मानले जात असल्याचे राजकीय वर्तुळात खुलेपणाने बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी घड्याळ चिन्हावर निडेबन जिल्हा परिषद गटातून त्यांनी विजय मिळवला होता. त्या कार्यकाळात रस्ते, नाल्यांची कामे, पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य सुविधा, दवाखाने यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आगदी विकास नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसणारी कामे हीच त्यांची राजकीय ताकद राहिली आहे.
गोरगरीब, शेतकरी, मजूर आणि वंचित घटकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने रस्त्यावर उतरले. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, प्रशासनावर दबाव टाकून कामे मंजूर करून घेण्याची क्षमता आणि मतदारांशी थेट संवाद ही त्यांची बलस्थाने मानली जातात.दरम्यान, निडेबन आणि लोहारा या दोन्ही गटांतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, एकुरकेकर यांच्या नावाने काहींच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे चित्र आहे. महायुती नेतृत्व नेमका कोणता गट त्यांच्या गळ्यात घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक मात्र निश्चित—जर मधुकरराव एकुरकेकर यांना उमेदवारी मिळाली, तर ही निवडणूक औपचारिक न राहता थेट ताकदीची लढत ठरणार आहे. विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.