Type Here to Get Search Results !

नेम धाब्यावर सिमेंट रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह; नागरिकांकडून चौकशीची मागणी


उदगीर प्रतिनिधी
उदगीर शहरातील बिदर रोड परिसरात बिझजवळून शेल्हाळ रोडपर्यंत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित कामामध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बिदर रोड ते शेल्हाळ रोड दरम्यान सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने काम केले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.या मार्गाची मूळ रुंदी सुमारे ३० फूट असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात केवळ १० फूट रुंदीचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात वाहतुकीच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः या मार्गावरून मोठ्या वाहनांची नियमित वर्दळ असते. मात्र रस्त्याची रुंदी कमी झाल्यास दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास त्यांना सहजपणे मार्गक्रमण करणे कठीण होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे. रस्त्याच्या गुणवत्तेसह त्याची रुंदी, मंजूर आराखडा आणि कामासाठी मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, अपुऱ्या रुंदीमुळे भविष्यात वाहतूक कोंडी तसेच अपघातांची शक्यता वाढू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित हस्तक्षेप करून कामाची सखोल तपासणी करावी आणि नियमांनुसारच रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.