Type Here to Get Search Results !

लोहारा जिल्हा परिषद गटातून मुकेश भालेराव यांचा दणदणीत विजय; जनतेचे मानले आभार

उदगीर प्रतिनिधी
लोहारा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून मुकेश भालेराव यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी लोहारा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार मानले. “मतदारांनी मतदानरूपी आशीर्वाद देत माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याची उतराई मी प्रामाणिकपणे काम करून करेन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.विजयानंतर झालेल्या आभार प्रदर्शनात मुकेश भालेराव म्हणाले की, या यशामागे केवळ त्यांचे प्रयत्न नसून संपूर्ण लोहारा गटातील जनतेचा विश्वास, सहकार्य आणि एकजूट आहे. प्रचार काळात गावागावांतून मिळालेला प्रतिसाद, नागरिकांनी केलेले सहकार्य आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळेच हा विजय शक्य झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.या निवडणुकीत गावातील सरपंच, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक घटकांनी दिलेल्या पाठिंब्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. प्रचारादरम्यान प्रत्येक गावात थेट संपर्क साधत जनतेच्या समस्या ऐकून घेण्याचा प्रयत्न केला गेला, याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसून आला, असेही ते म्हणाले.मुकेश भालेराव यांनी मा. आमदार अमित भैय्या विलासराव देशमुख यांचे विशेष आभार मानले. “आमदार अमित भैय्या देशमुख यांनी माझ्यावर विश्वास ठेवत लोहारा गटात स्वतः पायाला भिगरी बांधून प्रचार केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली. हा विजय त्यांचाही तितकाच आहे,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.“हा विजय माझा वैयक्तिक नसून लोहारा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा आहे. आता जबाबदारी वाढली आहे. विकासकामे, मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण प्रश्नांना प्राधान्य देऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख काम केले जाईल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.एकूणच, लोहारा जिल्हा परिषद गटात मिळालेला हा विजय जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असून, आगामी काळात विकासाभिमुख राजकारणाची अपेक्षा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे.