Type Here to Get Search Results !

निडेबन जिल्हा परिषद निवडणुकीत डॉ. दीपक सोमवंशी यांचा ऐतिहासिक विजय; मतदारांचे मानले जाहीर आभार


उदगीर प्रतिनिधी 
निडेबन जिल्हा परिषद गटातून डॉ.दीपक सोमवंशी यांचा दणदणीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी मतदार बांधवांचे आभार मानले. विजयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आभार प्रदर्शन सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा विजय कोणत्याही वैयक्तिक प्रचाराचा नसून माजी मंत्री आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या गेल्या काळातील विकासकामांचा थेट परिणाम आहे.डॉ. दिपक सोमवंशी म्हणाले की, निडेबन गटातील जनतेने भावना नव्हे तर माजी मंत्री आमदार संजय भाऊ बनसोडे यांचे काम पाहून मतदान केले आहे. “या भागात मागील काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या संदर्भात जे विकासकाम झाले, त्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे. हाच विश्वास या निवडणुकीत मतांच्या रूपाने व्यक्त झाला,” असे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रचारादरम्यान आपण कोणतीही दिशाभूल करणारी आश्वासने दिली नाहीत, तर फक्त झालेल्या आणि प्रस्तावित विकासकामांच्या आधारावर मतदारांकडे मतदानाचे आशीर्वाद मागितले, असेही त्यांनी स्पष्ट केले. “मी विकासकामांच्या जोरावरच जनतेकडे गेलो आणि जनतेने मला भरभरून मतदान करून विजयी केले,” असे ते म्हणाले.पुढील काळात जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाचा समतोल विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शाळांची दुरुस्ती आणि ग्रामविकासाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.या विजयामुळे निडेबन गटातील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याचे चित्र दिसून येत असून, विकासाच्या मुद्द्यावर जनतेने ठाम भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवरील विकासकामे आणि नेतृत्वावरचा विश्वास यामुळेच हा निकाल लागला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.