Type Here to Get Search Results !

नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नाईक नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात.!


​नालीअभावी गटारीचे पाणी थेट नागरिकांच्या घरात; दुर्गंधीमुळे जनजीवन विस्कळीत 
उदगीर: प्रतिनिधी
एकीकडे नगरपालिका प्रशासनाकडून शहरात स्वच्छतेचा मोठा गाजावाजा केला जात आहे. प्रत्येक प्रभागात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मोठा फौजफाटा घेऊन स्वच्छता मोहिमेचे इव्हेंट साजरे होत असताना, दुसरीकडे मात्र अनेक प्रभागांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः नाईक नगर परिसरात नाल्यांच्या अभावामुळे गटारीचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असून, यामुळे स्थानिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. ​बोरवेलमध्ये उतरतेय सांडपाणी नाईक नगर आणि परिसरात पक्क्या नाल्या नसल्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास मार्ग उरलेला नाही. हे घाण पाणी अनेक नागरिकांच्या बोरवेलमध्ये झिरपत असून, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत. वर्षानुवर्षे हेच दूषित पाणी वापरावे लागत असल्याने परिसरात कावीळ, अतिसार आणि त्वचारोगासारखे गंभीर आजार बळावत असल्याचे चित्र दिसत आहे.
​हद्दवाढ झाली, पण विकास कागदावरच!
उदगीर नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर अनेक सलम आणि ग्रामीण भाग शहराशी जोडले गेले. मात्र, हद्दवाढीला काळ लोटूनही हा भाग मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे. नाईक चौक परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन देऊन रस्ते आणि नाल्यांची मागणी केली आहे, परंतु नगरपालिका  प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.​डम्पिंग ग्राऊंडचा विळखा परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून डम्पिंगच्या माध्यमातून साठलेला कचरा उचलला जात नाही. यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. "आम्ही कर भरतो, मग आम्हाला नरकयातना का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.तात्काळ कारवाईची मागणी नगरपालिका प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन नाईक नगर परिसरातील कचरा उचलण्याची व्यवस्था करावी आणि कायमस्वरूपी नाल्यांचे बांधकाम करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा, येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.