उदगीर: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उदगीर आगाराचा कारभार सध्या रामभरोसे चालल्याचे चित्र दिसत आहे. आगाराच्या अनेक बसेस नादुरुस्त असतानाही त्या रस्त्यावर धावत असून, या बसमधून निघणाऱ्या प्रचंड काळ्याकुट्ट धुरामुळे (कार्बन) प्रदूषण तर वाढत आहेच, पण प्रवासी आणि वाहनधारकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.प्रवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
उदगीर आगारातून अहमदपूर, उदगीर शहर आणि ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात जाणाऱ्या अनेक बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या बसेस मार्गावर धावताना इतक्या मोठ्या प्रमाणात काळा धूर सोडतात की, मागून येणाऱ्या वाहनधारकांना रस्ता दिसणे कठीण होते. या विषारी धुरामुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार जडण्याची भीती निर्माण झाली असून, फुफ्फुसांच्या विकाराने नागरिक त्रस्त होत आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
नियमानुसार, ज्या बसेस जास्त धूर सोडतात किंवा नादुरुस्त आहेत, त्यांची दुरुस्ती करणे किंवा त्या मार्गावरून हटवणे ही जबाबदारी आगार प्रमुखांची असते. मात्र, उदगीर आगार प्रमुखांचे या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. "नादुरुस्त गाड्या रस्त्यावर उतरवून आगार प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे का?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
जनतेत संतापाची लाटरस्त्याने चालणारे पादचारी, दुचाकी स्वार आणि बसमधील प्रवासी या काळ्या धुरामुळे हैराण झाले आहेत. आगार प्रमुखांच्या या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांमध्ये मोठी चर्चा सुरू असून, या सर्व त्रासाला आगार प्रमुखच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

Social Plugin