Type Here to Get Search Results !

संस्थेचे पदाधिकारी जर क्लासेस घेत असतील तर गटशिक्षणाधिकारी मुग गिळून गप्प का?

उदगीर / प्रतिनिधी: 
उदगीर तालुक्यातील काही शासनमान्य अनुदानित शाळांमध्ये सध्या गंभीर प्रश्न निर्माण होत आहे . संस्थेतील पदाधिकारी आणि शिक्षक स्वतःच खासगी शिकवण्या (क्लासेस) चालवत असल्याची चर्चा रंगत असून, याचा थेट परिणाम शाळेतील शिक्षणावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही शाळांमध्ये शिक्षक वर्गात अपेक्षित दर्जाचे अध्यापन न करता विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या घरच्या क्लासेसमध्येच विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय पालकांवर आर्थिक ओझे वाढत आहे. फी संदर्भात ‘गुपचूप व्यवहार’ होत असल्याचीही चर्चा असून, याबाबत अधिकृत नोंदींचा अभाव असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांनी अशा प्रकारे खासगी व्यवसाय चालवणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळेत नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटत आहे. अनेक विद्यार्थी केवळ क्लासेसवर अवलंबून राहत असून, शाळेचे महत्त्व कमी होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर गटशिक्षण अधिकारी  शिक्षण विभागाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. इतक्या गंभीर प्रकारांवर प्रशासन ‘मुग गिळून गप्प’ का आहे, असा सवाल पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर अशा शाळांचे अस्तित्व टिकवण्याचा अर्थ काय, असा प्रश्न निर्माण होतो. संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.