उदगीर, प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील नागलगाव महसूल मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित “समाधान शिबिर” अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची मोठी सोय झाली असून, या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिरातील कामकाजाची आकडेवारी:
नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी आयोजित या शिबिरात विक्रमी कामे मार्गी लावण्यात आली, ज्यामध्ये:
सातबारा व आठ-अ वाटप: ४८३ सातबारा उतारे आणि ४०३ 'आठ-अ' प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.एक खिडकी योजना: ७२९ अर्ज निकाली काढण्यात आले.प्रमाणपत्रे व इतर: ३८६ विविध प्रमाणपत्रांचे वाटप आणि ५६७ शिधापत्रिकांचे वाटप झाले.महसूल प्रकरणे: ८२ फेरफार प्रकरणे निकाली काढली गेली, तर २३ सातबारा दुरुस्ती अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच, कमी-जास्त पत्रिकेची १ अंमलबजावणी पूर्ण झाली.प्रशासनाचा नागरिकांना कानमंत्र:यावेळी उपविभागीय अधिकारी मा. सुशांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "जनतेच्या समस्या वेळेत सोडवणे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तांत्रिक अडचणी दूर करून सेवा अधिक सुलभ करण्यावर आमचा भर आहे." त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना शैक्षणिक प्रमाणपत्रे वेळेत काढून घेण्याचे, तसेच रस्ते विषयक तक्रारी आणि मतदार पडताळणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान:
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मा. राम बोरगावकर यांनी केले. शिबिराचे यशस्वी नियोजन मंडळ अधिकारी श्री. उद्धव जाधव आणि नागलगाव मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केले.या शिबिरास कृषी विभाग, पंचायत समिती, महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालय, भूमि अभिलेख विभाग, पशुसंवर्धन विभाग, तसेच आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या समाधान शिबिराच्या यशामुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Social Plugin