Type Here to Get Search Results !

अनुष्काला न्याय द्या! लातूरमध्ये सकल मातंग समाजाचा तीव्र निषेध मोर्चा




जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भव्य आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. सकल मातंग समाज व दलित समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अनुष्का पाटोळे हिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी हा प्रकार निर्घृण हत्येचा असल्याचा दावा केला. “अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे” अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. संबंधित प्रकरणात जबाबदार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा संगनमत आढळल्यास जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.मोर्चादरम्यान समाजातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित करण्यात आला. “मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अन्यायाविरुद्धचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू राहील,” असा इशारा आयोजकांनी दिला.या आंदोलनात मातंग महिला शक्तीच्या तालुका प्रमुख सुलोचना बालाजी जाधव, छाया रामचंद्र शिंदे, सुवर्णा सुर्यवंशी, माया कांबळे, आशा सुर्यवंशी, लता सुर्यवंशी, तसेच मानवी हक्क अभियान चे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण श्रीपती रणदिवे, तालुका अध्यक्ष काशीनाथ साधूराम कांबळे, तालुका शहर उपाध्यक्ष संदीप तुकाराम सूर्यवंशी, तालुका कार्याध्यक्ष रविकांत निवृत्ती सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. मातंग समाज व मानवी हक्क अभियान यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.