उदगीर प्रतिनिधी
उदगीरात शिवजयंती व रमजान या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उदगीर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शक्ती प्रदर्शन पार पडले.या मोहिमेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्यासोबत पीएसआय आक्षय पाटील, पीएसआय मोहिते, पीएसआय देवकते यांच्यासह इतर दुय्यम अधिकारी आणि गोपनीय शाखेचे कर्मचारी संतोष दुबळगुंडे, निखिल भुकटे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.उदगीर शहरातील प्रमुख रस्ते, संवेदनशील भाग तसेच शहरालगतच्या ग्रामीण परिसरातून पोलीस पथकांनी संचलन केले. या शक्ती प्रदर्शनात पाच पोलीस अधिकारी, 45 पोलीस कर्मचारी आणि 60 होमगार्ड यांचा समावेश होता. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त पाहून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.सण-उत्सवांच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, समाजातील विविध घटकांमध्ये सौहार्द व शांतता टिकून राहावी, तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी गस्त वाढविण्यात आली असून, सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.शहरात शांतता व सलोखा अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले. सणांचा आनंद शांततेत व कायद्याच्या चौकटीत साजरा व्हावा, हा या शक्ती प्रदर्शनामागील मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

Social Plugin