Type Here to Get Search Results !

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनेचा असहकार आंदोलन..


कर्मचारी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलनाचा दिला इशारा 
प्रशासनाच्या सर्व विभागातील लिपीकांना जुनी पेन्शन योजना व विविध मागण्यांसाठी जयमहाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने असहकार आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन सोमवारी (१६ फेब्रुवारी) उपविभागीय अधिकारी उदगीर सोमनाथ जाधव व तहसीलदार उदगीर राम बोरगावकर यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या प्रशासनाच्या सर्व विभागातील लिपीक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारीत वेतन श्रेणी लागू करणे व पदोन्नती स्तर कमी करुन पदनामात बदल करणे तसेच जशास तसे जुनी पेन्शन लागू करणे, व तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनूकंपाच्या प्रतिक्षासुचीवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे आदी मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणेसाठी सनदशीर मार्गाने असहकार आंदोलन करण्यात येत आहे. तरी १६ ते २३ फेब्रुवारी दरम्यान आम्ही लातूर जिल्ह्यातील लिपीक बांधव असहकार आंदोलनात सहभागी होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदनावर जयमहाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश काळे, उपाध्यक्ष बळीराम केंद्रे, सचिव रोहिदास जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 १६ ते २३ असहकार आंदोलनाची रुपरेषा 
 १६ व १७ फेब्रुवारी रोजी लिपिक कर्मचारी कार्यालयात येणे, स्वाक्षरी करणे, काळी फित लावून बसून राहणे.
• १८ फेब्रुवारी रोजी लिपिक कर्मचारी कार्यालयात येणे, स्वाक्षरी करणे व कार्यालय समोर शांततापूर्वक मार्गने प्रलंबित मागण्यासंदर्भात घोषणा देणे
• २० फेब्रुवारी रोजी लिपिक कर्मचारी कार्यालयात येणे, स्वाक्षरी करणे व दिलेल्या निवदेनाचा पाठपुरावा करणे.
• २३ फेब्रुवारी पासून बेमुदत संपूर्ण काम बंद आंदोलन.