Type Here to Get Search Results !

निर्मळ' मनाच्या व्रतस्थ प्रकाशकाचा सन्मान डॉ. सुरेश सावंत, नांदेड.



आमचे प्रकाशकमित्र श्री. निर्मलकुमार सूर्यवंशी यांना प्रकाशन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. ही निर्मल प्रकाशन परिवारातील आम्हां सर्व लेखक कवींसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे!

ज्या काळात पुण्या-मुंबईतील कोणत्याही प्रकाशनाची पायरी चढणे अवघड होते, त्या काळात निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी ग्रामीण भागातील लिहित्या हातांना आवर्जून प्रसिद्धीचा प्रकाश दाखवला. निर्मल प्रकाशन नसते, तर वाडीतांड्यावरील उपेक्षितांची पुस्तके कोणी प्रकाशित केली असती? 

निर्मलकुमारांनी अक्षरशः पदराला खार लावून नवोदित लेखक-कवींची हजारभर पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यापैकी २७ पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना त्यांच्या ह्या ध्येयवेडाने अक्षरशः झपाटले आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. 

मुद्रणालय सुरू करण्याची पूर्वतयारी म्हणून आधी त्यांनी १९७७-७८साली नांदेडच्या आय. टी. आय. मधून मुद्रणकलेची पदविका प्राप्त केली. प्रकाशन सुरू करायचे, तर त्यासाठी स्वतःचा प्रिंटिंग प्रेस हवा, हा विचार. पुस्तकांची छपाई करण्यासाठी बॅंकेचे कर्ज काढून आधी निर्मल मुद्रणालय सुरू केले. 

निर्मलकुमार हे नरहर कुरुंदकर गुरुजींच्या वर्गातील विद्यार्थी आहेत. त्यांना दीर्घकाळ गुरुजींचा सहवास लाभला. निर्मल मुद्रणालयाच्या बांधकामाचा शुभारंभ गुरुजींच्या शुभहस्ते करण्यात आला. निर्मलकुमार यांच्या आयुष्यात कुरुंदकर गुरुजींना अनन्यसाधारण स्थान होते आणि आजही आहे. 

'त्रिमूर्ती गीते' हे निर्मल प्रकाशनाचे पहिले पुस्तक १९७१मध्ये प्रकाशित झाले. तेव्हापासून गेली ५५ वर्षे ही अक्षरयात्रा अखंड चालूच आहे. 

निर्मल प्रकाशन हा केवळ व्यावहारिक व्यवसाय नसून व्रतस्थपणे चालविलेले एक व्रत आहे. व्रत आचरणासाठी जो भक्तिभाव असावा लागतो, तो भक्तिभाव निर्मलकुमारांच्या अंतःकरणात ओतप्रोत भरलेला आहे. 

निर्मलकुमार हे आई कृष्णामायच्या संस्कारात घडलेले सत्त्वशील व्यक्तिमत्त्व आहे. मुळात हा एक निर्मळ मनाचा माणूस आहे. निर्मलकुमार हे एक उत्कृष्ट लेखक आणि कवी आहेत. गोंदण, प्रेमप्रभा आणि मधशाळा हे त्यांचे ३ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. माणूस नावाचा प्राणी आणि शेतकरी राजा ह्या दोन बालकादंबरी त्यांच्या नावावर जमा आहेत. डॉ. भगवान अंजनीकर यांच्या साहित्यावरील समीक्षेचा 'शब्दगंध' हा ग्रंथ त्यांनी संपादित केलेला आहे. 

निर्मलकुमार हा एक अतिशय सरळमार्गी माणूस आहे. मनात आणले असते, तर प्रकाशन व्यवसायातील शॉट कट्स त्यांनाही अवलंबिता आले असते, पण ते त्या सगळ्या गैरप्रकारांपासून कटाक्षाने दूर राहिले. त्यांनी सरळमार्गाने, भरपूर सूट देऊन पुस्तके विकली, पण इमान विकले नाही. काहींनी उधारीवर पुस्तके विकत घेऊन पाच लाख रुपयांचा गंडा घातला, पण ह्या लाखांच्या नुकसानीमुळे निर्मलकुमार खंतावत बसले नाहीत. क्षमाशीलपणे अशा वृत्तींना माफ करून ते पुढे चालत राहिले. प्रकाशन व्यवसाय हे निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या उपजीविकेचे साधन नसून तो त्यांचा श्वास आहे. हल्ली वाचनसंस्कृती कमी झाल्यामुळे पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय कमी झाली आहे. त्यामुळे प्रकाशन व्यवसाय हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो आहे. अशा नकारात्मक कालखंडातही निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी प्रकाशन व्यवसायावरील आपली निष्ठा तसूभरही ढळू दिलेली नाही. हा पुरस्कार म्हणजे त्या अव्यभिचारी निष्ठेचेच हे फलित होय, असे मला वाटते. 

आमची दोघांचीही पहिली पुस्तके ( माझा 'अबोली' हा कवितासंग्रह आणि डॉ. मथु सावंत यांचा 'पाण्यातील पायवाट' हा कथासंग्रह) निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. त्यानंतरचीही आमची काही पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. वयाने लहान असल्यामुळे, आम्ही किती तरी वेळा त्यांच्यावर रुसलो, रागावलो, पण त्यांनी प्रत्येक वेळी वडीलकीच्या नात्याने आम्हाला समजून घेतले. लेखक-प्रकाशकाच्या नात्यात आणि मित्रप्रेमात अंतर येऊ दिले नाही. हा निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या मनाचा मोठेपणा आहे! आता वयाच्या ७३व्या वर्षी निर्मलकुमार अधिकच शांत झाले आहेत. निर्मलकुमार यांचा अमृतमहोत्सव थाटामाटात साजरा व्हावा, असे आमच्यासारख्या अनेक मित्रांना मनापासून वाटते आहे. तसा तो होईलच, यात काही शंका नाही. 

निर्मलकुमार यांचे आत्मकथन, 'अक्षरनाती' ही माझी अतिशय आवडती कलाकृती असल्यामुळे आजवर मी ह्या पुस्तकाची किमान पाच पारायणे केली असतील. ह्या पुस्तकाच्या निर्मितीत मला खारीचा वाटा उचलता आला, याचा आनंद आहे. नुकतीच ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. 

निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे 'अक्षरनाती' हे आत्मकथन म्हणजे नांदेड जिल्ह्यातील साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि ग्रंथप्रसाराच्या चळवळीचा ओघवता इतिहास आहे. अलीकडे रक्ताची नाती उसवत चालली आहेत, अशा कालखंडात निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी आपल्या प्रकाशन व्यवसायाच्या माध्यमातून हजारो 'अक्षरनाती' निर्माण केली आहेत. अतिशय जिव्हाळ्याने ती जपली-जोपासली आणि वृद्धिंगत केली आहेत. अक्षरनाती सांभाळण्याच्या नादात मी रक्ताच्या नात्यांना हवा तसा न्याय देऊ शकलो नाही, हे ते प्रांजळपणे कबूल करतात. 

आजपासून पन्नास वर्षांपूर्वी, साहित्य-संस्कृतीची कसलीच पार्श्वभूमी नसलेला, हडसनीचा एक मुलगा नांदेड शहरात येतो आणि 'मला प्रकाशक व्हायचय' या निर्धाराने झपाटतो. हे त्यांचे झपाटलेपण आणि प्रकाशन व्यवसायातील समर्पण गेली ४०-४५ वर्षे मी जवळून पाहतो आहे. निर्मल प्रकाशनाचे कार्यालय हे अनेक सांस्कृतिक चळवळींचे केंद्रस्थान आहे. 

नफा-तोट्याची चिंता न करता अतिशय निष्ठेने ते आपला प्रकाशन व्यवसाय सांभाळून आहेत. त्यांचे ते ध्येयवेड आणि संवेदनशीलता 'अक्षरनाती' ह्या आत्मकथनाच्या पानोपानी जाणवते. ह्या लेखनात कोणताही आवेश नाही किंवा अभिनिवेष नाही. ह्या लेखनात कुठेही आत्मप्रदर्शन नाही, आत्मगौरव नाही किंवा आत्मप्रौढी नाही. हे संपूर्ण लेखन करत असताना लेखकाने 'मी' कडे अतिशय अलिप्तपणे आणि तटस्थपणे पाहिलेले आहे. त्यामुळे ही तटस्थता ह्या लेखनाला अतिशय उंचीवर घेऊन जाते. 'अक्षरनाती' म्हणजे एका प्रकाशकाच्या जीवनसंघर्षाची कृतार्थ फलश्रुती आहे. लेखकाच्या नावाप्रमाणेच हे एक अतिशय निर्मळ आणि प्रांजळ असे स्वकथन आहे. स्वयंपूर्णता, तटस्थता, तारतम्य, सात्त्विक आनंदप्राप्ती, सत्यकथन, प्रामाणिकपणा इ. आत्मकथनाच्या निकषांवरही 'अक्षरनाती' अव्वल ठरली आहे. 'अक्षर रिश्ते' ह्या शीर्षकाखाली हे पुस्तक हिंदीत अनुवादित झाले आहे आणि अखिल भारतीय स्तरावर पोहोचले आहे. 'अक्षरनाती'वर दोन स्वतंत्र समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले आहेत. म्हणजे ह्या कलाकृतीने इतिहास घडविला आहे. 

निर्मलकुमार यांच्या खाचखळग्यांनी भरलेल्या जीवनप्रवासात सौ. सिधूताईंनी त्यांना निष्ठेने साथ दिली आहे. चिरंजीव अमोल हा सर्वोच्च न्यायालयात अभिवक्ता म्हणून कार्यरत आहे. प्रिया आणि पूजा ह्या अतिशय गुणी मुली आहेत. निर्मलकुमारांचे हा पंचकोनी परिवार अतिशय आनंदी आणि समाधानी आहे. 

मागील ४० वर्षांत निर्मलकुमार यांनी नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून, तसेच नरहर कुरुंदकर सार्वजनिक वाचनालय, इंदिरा सार्वजनिक वाचनालय आणि कृष्णाई सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी अनमोल योगदान दिले आहे. त्या कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने २०१९मध्ये त्यांना 'डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र' पुरस्काराने सन्मानित केले आहे.

नारायण सुर्वे यांच्यापासून डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत अनेक मान्यवरांनी वेळोवेळी निर्मलकुमार यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आहे. यापूर्वी, उदगीर येथे संपन्न झालेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर निर्मलकुमार यांच्या प्रकाशकीय कारकिर्दीचा सन्मान करण्यात आला होता. 

आता महाराष्ट्र शासनाच्या श्री. पु. भागवत पुरस्काराच्या निमित्ताने निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या प्रकाशन क्षेत्रातील कार्याचा गौरव होतो आहे, ही निश्चितच मराठवाड्यासाठी भूषणावह घटना आहे. आमचे लेखक-प्रकाशक मित्र निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे हार्दिक अभिनंदन!

भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.