Type Here to Get Search Results !

महसूल विभाग कार्यवाही करण्याचे करतय ढोंग: उदगीरात अवैध्य वाळूचा सुळसुळाट




उदगीर प्रतिनिधी: 
उदगीर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व विक्रीला पुन्हा एकदा उधाण आले असून महसूल विभागाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने उरगीर शहरातील व ग्रामीण भागातील वाळूच्या ढिगाऱ्यांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली होती. मात्र ही कार्यवाही अल्पकालीन ठरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.उदगीर तालुक्यात पुन्हा नव्याने विविध भागांत दुकानासमोर वाळूचे ढिगारे टाकून खुलेआम विक्री केली जात आहे. काही ठिकाणी थातूर माथूर कार्यवाही झाल्याचे सांगितले जात असले तरी अनेक ठिकाणी कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.महसूल विभाग कार्यवाही करण्याचे करत ढोंग पुन्हा उदगीरात अवैध्य वाळूचा सूळसूळाट 
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे २० ते २५ वाळूने भरलेले टिपर नांदेड रोडमार्गे उदगीरकडे येत आहेत. यातील काही वाहने क्रमांकफलकाविना असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीला मोकळे रान मिळाल्याचे दिसून येते.
दरम्यान, काहींकडून महसूल विभागावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. कथितरित्या मासिक हप्ते घेऊन अवैध वाळू विक्रीला मूकसंमती दिली जात असल्याची चर्चा उदगीर शहरात रंगत आहे. या आरोपांबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.अवैध वाळू उत्खननामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसत असून पर्यावरणीय हानीही होत आहे. तरीही संबंधित यंत्रणा प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अवैध वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, महसूल विभागाच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.