मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते सन्मान; समाधानकारक ग्राहक सेवेची पावती
उदगीर प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या लातूर परिमंडळातर्फे आयोजित सोहळ्यात उदगीरचे वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. सय्यद मुजीब बशिरसाब यांना 'उत्कृष्ट कर्मचारी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता मा. श्री. अरविंद बुलबुले यांच्या हस्ते हा गौरव सोहळा दिमाखात पार पडला.सय्यद मुजीब हे विभागीय कार्यालय उदगीर अंतर्गत शहर उपविभाग शाखा क्रमांक ०२ येथे वरिष्ठ तंत्रज्ञ (तारमार्ग) म्हणून कार्यरत आहेत. सन २०२५-२६ या वर्षात त्यांनी ग्राहक तक्रारींचे तत्पर निवारण करत अत्यंत समाधानकारक कामगिरी बजावली. त्यांच्या या कामाची दखल घेत परिमंडळ स्तरावर त्यांची 'उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी' म्हणून निवड करण्यात आली.लातूर येथे झालेल्या या विशेष समारंभात त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. ऐन कामगार दिनी मिळालेल्या या पुरस्कारामुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वच स्तरांतून सय्यद मुजीब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या कामाप्रती असलेली चिकाटी आणि ग्राहकांना दिलेली तत्पर सेवा यामुळेच हा बहुमान मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Social Plugin