उदगीर प्रतिनिधी
क्रांतिसूर्य, बहुजन समाजाचे कैवारी आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उदगीर येथील तहसील कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि आदराभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या समतेच्या आणि शिक्षणाच्या विचारांचे स्मरण केले.कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फुले यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.याप्रसंगी बोलताना तहसीलदार राम बोरगावकर म्हणाले की, "महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांनी आयुष्यभर अनिष्ट प्रथा, जातीभेद आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. विशेषतः महिलांचे शिक्षण आणि समाजातील तळागाळातील लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी जे कार्य केले, ते आजही आपल्यासाठी दीपस्तंभासारखे आहे. आजच्या काळात त्यांच्या विचारांची नितांत गरज असून, त्यांच्या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात ठेवणे आवश्यक आहे."कार्यक्रमात उपस्थित कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुलेंच्या कार्यावर प्रकाश टाकला. महिला शिक्षणासाठी त्यांनी उघडलेली पहिली शाळा आणि विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी दिलेला लढा, यामुळेच आज स्त्रियांना सन्मानाने जगता येत आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला.या जयंती उत्सवावेळी तहसीलदार राम बोरगावकर यांच्यासह महसूल सहायक सुग्रीव बिरादार, रमेश पाटणकर, शिपाई रसूल मामा, महसूल सेवक पवन फड आणि अस्मिता कापडे उपस्थित होते. या जयंती उत्सवामुळे तहसील कार्यालय परिसरात महात्मा फुले यांच्या विचारांचा सकारात्मक माहोल निर्माण झाला होता. कार्यक्रमाची सांगता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयघोषाने करण्यात आली

Social Plugin