Type Here to Get Search Results !

उदगीरमध्ये शिक्षण व्यवस्थेचा गोंधळ; गटशिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष


उदगीर प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर स्थानिक स्तरावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात अनेक शाळांचे विनापरवानगी स्थलांतर झाल्याचे समोर आले असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. ग्रामीण भागातील काही शाळा शहरात हलवण्यात आल्या आहेत, तर शहरातील शाळा ग्रामीण भागात स्थलांतरित झाल्या आहेत. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली शासकीय परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून पालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, तालुक्यातील काही शाळा पाचवीपर्यंत चालवल्या जात असून त्यांना अधिकृत मान्यता नसल्याचेही बोले जात आहे. विशेष म्हणजे, अशा शाळा मागील दहा ते पंधरा वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. इतक्या दीर्घ काळापासून बेकायदेशीरपणे शाळा चालू असताना संबंधित विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिक व पालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात असून त्यांनी या सर्व घडामोडींवर मौन बाळगल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. शासन वेळोवेळी दर वर्षाला शाळेवर कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा शिक्षणाधिकारी मूग गिळून गप्प का?हा प्रश्न निर्माण झाला आहे शिक्षण विभागाने याची दखल घेऊन पारदर्शक चौकशी करणे आणि योग्य ती कारवाई करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.