उदगीर / प्रतिनिधी
उदगीर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे बेकायदेशीर दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे चित्र समोर येत आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे. उदगीरमध्ये अधिकृत बार असले तरी काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप होत आहे. काही बारमध्ये एक्सपायरी झालेली किंवा निकृष्ट दर्जाची मद्यविक्री केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ही बाब संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा दावा आहे. तसेच, काही अधिकाऱ्यांकडून दरमहा ठराविक रक्कम घेऊन या व्यवसायांना संरक्षण दिले जात असल्याच्या आरोपांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे नियमांना बगल देत अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचे दिसून येते. गावठी दारू विक्री, तसेच काही दुकानांमधून गुप्तपणे मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. दरम्यान, उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्याची चर्चा असून नव्याने नियुक्त अधिकारी कार्यरत नसल्याचीही बाब समोर आली आहे. परिणामी, विभागाचे नियंत्रण शिथिल झाल्याचे चित्र दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, राज्य उत्पादक शुल्क अधीक्षकांनी तात्काळ लक्ष घालून उदगीर तालुक्यातील बार व दारू विक्री केंद्रांची सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Social Plugin