Type Here to Get Search Results !

उदगीरात अवैध दारूचा सुळसुळाट; राज्य उत्पादक शुल्क विभागाचे दुर्लक्ष? नागरिकांमध्ये संताप


उदगीर प्रतिनिधी
 उदगीर तालुक्यामध्ये अवैध दारूच्या विक्रीला पुन्हा जोरदार उधाण आले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्थानिक स्तरावर अवैध दारूचे अड्डे उघडपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, राज्य उत्पादक शुल्क विभागाचे याकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही भागांमध्ये दिवसाढवळ्या अवैध दारूची विक्री सुरू असून त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्याने नियुक्त झालेले अधिकारी परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले असून शहरात अनेक ठिकाणी खुलेआम विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे.याबाबत स्थानिक नागरिकांनी असा आरोप केला आहे की, काही कर्मचारी व अधिकारी कारवाई करण्याऐवजी कथितरित्या हप्ते वसुलीत व्यस्त असल्याने अवैध धंदे फोफावत आहेत. त्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील तरुण पिढीवरही विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.उदगीर उदगीर तालुक्यामध्ये अवैध्य दारूची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. विशेषतः राज्य उत्पादक शुल्क अधीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.दरम्यान, अवैध दारूच्या वाढत्या प्रमाणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने वेळेत पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.