नाल्यांअभावी सांडपाणी शिरले घरात; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा नाला बुजवण्याचा इशारा
उदगीर: प्रतिनिधी
उदगीर नगरपालिका प्रशासन सध्या शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे. मात्र, शहराच्या नाकाखाली असलेल्या देगलूर रोडवरील नाईक चौक, संगमेश्वर महादेव मंदिराच्या पाठीमागील भागात परिस्थिती अत्यंत भीषण आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, संतप्त रहिवाशांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.प्रशासनाचा 'इव्हेंट' सुरू, नागरिक मात्र त्रस्तनगरपालिकेचे पथक सध्या शहरात ठिकठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबवत असल्याचे दाखवत आहे. यावर उपरोधिक टीका करताना स्थानिक नागरिक म्हणत आहेत की, "प्रशासनाने केवळ सोयीच्या ठिकाणी व्हिडिओ न बनवता, नाईक चौक परिसरातील घाणीच्या साम्राज्यात येऊन प्रत्यक्ष काम करावे आणि इथल्या नरकयातनांचाही व्हिडिओ जगाला दाखवावा."घरात सांडपाणी, बोरवेल झाले दूषितया परिसरात पक्क्या नाल्यांचा पूर्णतः अभाव आहे. परिणामी, गटारीचे मैलापाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. हेच दूषित पाणी जमिनीखाली झिरपून बोरवेलमध्ये जात असल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत विषारी बनले आहेत. यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना गंभीर आजारांची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.विकासापासून वंचित हद्दवाढ भाग
नगरपालिकेची हद्दवाढ होऊन अनेक वर्षे लोटली, तरी हा भाग अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. कचऱ्याचे ढीग साचल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.नागरिकांचा अल्टिमेटम: नाला बुजवणार!प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. जर पालिकेने तात्काळ या समस्येवर कारवाई केली नाही, तर नागरिक स्वतः पुढाकार घेऊन हा नाला कायमचा बुजवून टाकणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Social Plugin