उदगीर प्रतिनिधी
उदगीर शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या जाकीर हुसैन चौक परिसरात सध्या घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः येथील चिकन विक्री दुकाने दार उघड्यावरच टाकले जाणारे प्राण्यांचे अवशेष, आतडे आणि टाकाऊ पदार्थांमुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून, वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन कोणतीही कारवाई करण्यास तयार नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. उघड्यावरील घातीमूळे दुर्गंधीत वाढ
जाकीर हुसैन चौक हा शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात चिकन दुकानांसमोरच अस्वच्छतेचे मोठे केंद्र निर्माण झाले आहे. चिकन विक्रेते दुकानातील टाकाऊ पदार्थ, प्राण्यांचे आतडे आणि इतर अवशेष थेट रस्त्यालगत फेकून देत आहेत. या उघड्यावरील मांसल कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, पादचाऱ्यांना नाक मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे.रोगराईची भीती आणि प्रशासकीय उदासीनता सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत असताना, अशा प्रकारे उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या घाणीमुळे माश्या आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि इतर संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि या भागातील पान टपरी धारकांनी या घाणीचा बंदोबस्त करण्याबाबत वेळोवेळी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला अवगत केले आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. 'स्वच्छ भारत' अभियानाच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्ष कृती करताना मात्र 'बघ्याची' भूमिका घेत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.
नागरिकांची आणि व्यावसायिकांची मागणी
परिसरातील दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी आणि व्यवसाय करणाऱ्या पान टपरी धारकांचे जगणे कठीण झाले आहे. "आम्ही अनेकदा तक्रारी केल्या, पण नगरपालिकेचे अधिकारी केवळ आश्वासन देतात, प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. चिकन विक्रेत्यांच्या या मुजोरीमुळे आमचा व्यवसाय आणि आरोग्य दोन्ही धोक्यात आले आहे," अशी संतप्त भावना एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली.तात्काळ कारवाईचा इशारा जाकीर हुसैन चौकातील हे घाणीचे साम्राज्य तात्काळ साफ करून, उघड्यावर अवशेष फेकणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर नगरपालिकेने येत्या काही दिवसांत या समस्येकडे लक्ष दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी दिला आहे. आता तरी नगरपालिकेला जाग येणार का? की एखाद्या मोठ्या साथीच्या आजाराची प्रशासन वाट पाहत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Social Plugin