उदगीरमध्ये १५ लाखांच्या निधी हडप प्रकरणावरून युथ पॅंथरचे आमरण उपोषण सुरूच
उदगीर: प्रतिनिधी
उदगीर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे "उपोषणकर्त्यांना न्याय देणार कोण?" असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.काय आहे नेमके प्रकरण? जळकोट येथील मौजे डोंगरगाव येथील सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संगनमताने सन २०२२-२३ मधील बौद्ध समाज सभागृह बांधकामासाठी आलेला १५ लक्ष रुपयांचा निधी कागदोपत्री खर्च दाखवून हडप केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या हलगर्जीपणामुळेच शासनाचा निधी चुकीच्या पद्धतीने खर्ची पडल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे.युथ पॅंथर संघटनेचे आंदोलनया भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर अनुसूचित जाती अंतर्गत (Atrocity) कारवाई करावी आणि त्यांचे तात्काळ निलंबन करावे, या मागणीसाठी युथ पॅंथर संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे आणि भागवत तलवारे हे दिनांक ०९ एप्रिल २०२६ पासून कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.प्रशासनाकडून केवळ 'गाजर'उपोषणकर्त्यांनी आरोप केला आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रकरणावर कोणतीही ठोस कारवाई करण्याऐवजी केवळ 'गाजर' दाखवण्याचे काम करत आहे. प्रशासकीय अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
"जोपर्यंत भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही. आम्ही न्यायासाठी शेवटपर्यंत लढू." सुनील कांबळे (तालुकाध्यक्ष, युथ पॅंथर संघटना) उदगीर परिसरातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात या उपोषणाची मोठी चर्चा असून, आता वरिष्ठ प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Social Plugin