पाणी पुरवठा सभापतीच्या पतीनेच घेतले खुर्चीचा ताबा? उदगीर नगर परिषदेतील कारभारावर प्रश्नचिन्ह
February 24, 2026
उदगीर प्रतिनिधी
उदगीर नगर परिषदेमध्ये सध्या प्रशासनाचा कारभार गोंधळात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर नगर परिषदेमध्ये विविध समित्यांचे सभापती निवडून झाले आहेत. मात्र पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदाबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सभापती म्हणून महिला निवडून आल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्या पतीच कार्यालयीन खुर्चीवर बसून कारभार पाहत आहे.
स्थानिक नागरिक आणि काही नगरसेवकांच्या मते, पाणी पुरवठा विभागाशी संबंधित बैठका, कागदपत्रांवरील निर्णय प्रक्रिया आणि अधिकाऱ्यांशी होणारी चर्चा यामध्ये सभापतींच्या पतींचा थेट हस्तक्षेप दिसून येत आहे. अधिकृत पद नसतानाही तेच आदेश देत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.महिला आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना संधी देण्यामागचा उद्देश सक्षम नेतृत्व घडवणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात पद महिलांच्या नावावर आणि कारभार पतींकडून चालवला जात असेल, तर तो लोकशाही व्यवस्थेला धरून नाही, अशी टीका होत आहे. नागरिकांमध्येही याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.दरम्यान, नगर परिषदेतील एकूणच कारभाराबाबतही असमाधान व्यक्त होत आहे. पाणी पुरवठ्याच्या तक्रारी, अनियमित वितरण आणि तांत्रिक अडचणी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असताना अधिकार नसलेल्या व्यक्तीकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे.याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नियमबाह्य हस्तक्षेप होत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Social Plugin