सांगली प्रतिनिधी
17 मे2026 नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या 11 व्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत महाराष्ट्रातील युवा कराटेपटू रणदिप सिद्धप्पा चौगुले याने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
रणदिपने कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. स्पर्धेदरम्यान त्याने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि रौप्यपदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले.
याचबरोबर रणदिपची आगामी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी श्रीलंका येथे निवड झाली असून, त्याच्या क्रीडा कारकिर्दीसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र , सांगली जिल्ह्यातील नागरिक येळदरी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच येळदरी ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
“देशाचे नाव उंचाव, नेहमी पुढे चल” हा संदेश देत रणदिपने युवा पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Social Plugin