सार्वजनिक ठिकाण बनले मालकीचे ठिकाण ...कोण्ही यावे आपले घाण टाकून जावे
February 08, 2026
उदगीर प्रतिनिधी
शहरातील मार्केट यार्डजवळील कापड मार्केट परिसरात असलेल्या ओंकारेश्वर मंदिराच्या जागेवर सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नगर परिषद अंतर्गत येथे बगीचा विकसित करण्यात आला असून लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा तसेच ओंकारेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.
याच ठिकाणी सभागृहासाठी आमदार संजय बनसोडे यांनी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र मंदिराच्या शेजारी व बगीच्याच्या मध्यभागी काही व्यक्ती सार्वजनिक जागा स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
परिसरातील प्रसिद्ध व्यापारी अमर खात्री यांनी कोणतीही परवानगी अथवा नागरिकांची सहमती न घेता त्यांच्या नव्या बांधकामातील टाकाऊ साहित्य व मुरूम ट्रॅक्टरद्वारे आणून या सार्वजनिक ठिकाणी टाकले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे बगीच्याचे स्वरूप बिघडले असून लहान मुलांच्या खेळण्याच्या जागेवर थेट अतिक्रमण होत आहे.गल्लीतील महादेव मंदिराची स्थापना करणारे काही व्यक्ती व परिसरातील नागरिक दबक्या आवाजात नाराजी व्यक्त करत असून “कोणाला न विचारता सार्वजनिक जागेवर मनमानी सुरू आहे” असा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित ट्रॅक्टर मालक व कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर नगर परिषद प्रशासनाने पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Social Plugin