उदगीर / प्रतिनिधी :
निडेबन जिल्हा परिषद सर्कलमधून मताधिक्याने विजयी झालेले डॉ. दीपक सोमवंशी यांनी निवडणुकीनंतर कुमदाळ व गुरधाळ गावांना भेट देत मतदारांचे आभार मानले. त्यांच्या आगमनानिमित्त दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. निवडणुकीत मिळालेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. दिपक सोमवंशी यांनी आपल्या विजयाचे श्रेय मतदारांना दिले. “हा माझा नाही, तर तुमचा विजय आहे. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे,” असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी विकासकामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “माजी मंत्री तथा आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहू. पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.ग्रामस्थांनीही विविध समस्या व अपेक्षा यावेळी मांडल्या. काही ठिकाणी अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. सोमवंशी यांनी दिले.सत्कार कार्यक्रमानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्थानिक पातळीवरील विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. गावांच्या प्रगतीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.एकूणच, विजयाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भेटीमुळे दोन्ही गावांमध्ये नव्या अपेक्षांना बळ मिळाले असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Social Plugin