Type Here to Get Search Results !

उदगीरच्या शिरपेचात मानाचा तुरा; अनिकेत करखेलीकरची India AI Impact Summit साठी निवड


उदगीर शहरातील चि. अनिकेत अतुल करखेलीकर (रामदासी) यांची नवी दिल्ली येथे पार पडलेल्या India AI Impact Summit 2026 (YUVAi Global Youth Challenge अंतर्गत) साठी भारत सरकारतर्फे निवड झाली आहे. दिनांक 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामधून अनिकेतची निवड होणे ही उदगीरकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
परिषदेत अनिकेतने आपल्या सहकारी निखिलसोबत मिळून “आरोग्य AI” या स्टार्टअप संकल्पनेवर सादरीकरण केले. ग्रामीण व शहरी भागातील डॉक्टरांना रुग्णांची माहिती जलद आणि अचूकरीत्या उपलब्ध व्हावी, निदान प्रक्रियेला तांत्रिक सहाय्य मिळावे आणि एकूण आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता उंचवावी, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणामकारक वापर करण्याच्या दृष्टीने ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनिकेत सध्या वेल्लूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), भोपाळ येथे बी.टेक (Artificial Intelligence आणि Machine Learning) द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि उदगीरवासीयांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
उदगीर शहरासाठी ही अभिमानास्पद कामगिरी मानली जात असून, अनिकेतच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.